Daman and Diu Elections: भाजपनं घडवला नवा इतिहास, निकालापूर्वीच 75 टक्के उमेदवार विजयी? भानगड नेमकी काय?

Daman and Diu Elections: भाजपनं घडवला नवा इतिहास, निकालापूर्वीच 75 टक्के उमेदवार विजयी? भानगड नेमकी काय?

| Updated on: Nov 07, 2025 | 10:38 AM

दीव दमणमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने नवा इतिहास घडवला आहे. निकालाआधीच 122 पैकी 91 उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याने भाजपने 75 टक्के जागा जिंकल्या आहेत. यावर काँग्रेसने 80 टक्के उमेदवारी अर्ज बाद केल्याचा आरोप करत मुंबई हायकोर्टात जाण्याची तयारी दर्शवली आहे.

दीव दमण केंद्रशासित प्रदेशातील स्थानिक निवडणुकांमध्ये एक अनोखा निकाल पाहायला मिळत आहे. या निवडणुकांमध्ये निकालाआधीच भारतीय जनता पक्षाने (भाजप) मोठा विजय संपादन केला आहे. ग्रामपंचायत आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये एकूण 122 जागांपैकी भाजपचे 91 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यामुळे भाजपने जवळपास 75 टक्के जागा निकालापूर्वीच आपल्या ताब्यात घेतल्या आहेत.

इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालानुसार, पाच वर्षांपूर्वी दमण दीवमध्ये भाजपच्या जिल्हा पंचायतीत केवळ नऊ जागा होत्या. मात्र यंदा 48 पैकी 35 जिल्हा पंचायती जागांवर भाजपने बिनविरोध विजय मिळवला आहे. तसेच, 44 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांपैकी 30 ठिकाणी भाजपचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. दमण जिल्हा पंचायतीमध्ये 16 पैकी 10 जागा भाजपने बिनविरोध जिंकल्या, तर दमण पालिकेमध्ये 15 वॉर्डपैकी 12 आणि 16 ग्रामपंचायतींपैकी 10 ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.

या निकालांवर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. काँग्रेस निवडणूक प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या 80 टक्के उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. उमेदवारी अर्जासाठी सात दिवसांचा कालावधी दिला असताना, पहिले दोन दिवस अर्ज उपलब्ध नव्हते आणि नंतर अर्जाच्या पडताळणीचे ठिकाण अचानक बदलण्यात आले, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेस याप्रकरणी मुंबई हायकोर्टात धाव घेणार आहे.

Published on: Nov 07, 2025 10:38 AM