Shani Shingnapur : देवाच्या दारीच भामटेगिरी.. ‘या’ 5 बनावट App च्या माध्यमातून भाविकांना लुबाडलं, प्रकरण काय?
शनि शिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानमध्ये बनावट ॲप्सच्या माध्यमातून भाविकांच्या देणगीची चोरी झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे आणि पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे.
शनी शिंगणापूर देवस्थानशी संबंधित बनावट अॅप प्रकरणात तपासाला आता गती प्राप्त झाली आहे. देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांत तब्बल १ कोटीहून अधिक रक्कम जमा झाल्याचे उघड झाले आहे. संबंधित कंपन्यांनी वेळोवेळी थोड्या-थोड्या रकमेच्या स्वरूपात कधी १ लाख तर कधी २ लाख अशा प्रकारे ही रक्कम त्यांच्या खात्यांत वळवल्याचे समोर आले आहे. सध्या त्या दोन कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु असून त्यांचे नावे सांगण्यास मात्र पोलिसांनी नकार दिलाय. या दोन्ही कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी पोलीस प्रशासनाकडून सुरू असून त्यांनी हे पैसे पुढे कोणाला दिले का? यामागे नेमकं कोण आहे? याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायबर पोलिसांनी आतापर्यंत पाच बनावट ॲप्स (उदा. pujapariseva.com, navgrahmandir.com, onlineprasad.com, hariom.app, epuja.com) आणि वेबसाइट्सवर गुन्हे दाखल केले आहेत. हे ॲप्स आणि वेबसाइट्स व्हीआयपी दर्शन, ऑनलाइन पूजा, अभिषेक आणि तेल अर्पण करण्याच्या नावाखाली देवस्थान ट्रस्टची कोणतीही अधिकृत परवानगी नसताना भाविकांकडून पैसे गोळा करत होते.
