IndiGo Flight Chaos : इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर कुणी…
इंडिगोच्या घोळामुळे सलग तिसऱ्या दिवशीही विमान प्रवाशांचे हाल सुरू आहेत. आजही 500 विमानं रद्द झाल्याने प्रवाशांचा संताप शिगेला पोहोचला आहे. DGCA च्या नवीन नियमांमुळे उद्भवलेल्या पायलट आणि क्रू मेंबर्सच्या कमतरतेमुळे हा पेच निर्माण झाला. केंद्र सरकारने प्रवाशांना तत्काळ पैसे परत करण्याचे आदेश दिले आहेत.
इंडिगो कंपनीच्या घोळामुळे विमान प्रवाशांवरील संकट सलग तिसऱ्या दिवशीही कायम आहे. आजही देशभरात इंडिगोची जवळपास 500 विमानं रद्द करण्यात आली, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. दिल्ली, मुंबई, हैदराबाद, चेन्नई आणि अहमदाबादसह अनेक प्रमुख विमानतळांवर प्रवाशांचा संताप पाहायला मिळाला. दिल्ली विमानतळावर एका परदेशी महिलेने थेट काउंटरवर चढून आक्रोश व्यक्त केला, तर निकृष्ट जेवणामुळे संतप्त प्रवाशांनी इंडिगो कर्मचाऱ्यांशी खटके उडवले. कोलकाता आणि अहमदाबाद विमानतळांवरही प्रवाशांनी जोरदार संताप व्यक्त केला.
या गोंधळाचे मुख्य कारण म्हणजे DGCA ने 1 डिसेंबरपासून लागू केलेले पायलट आणि क्रू मेंबर्सच्या कामासंबंधीचे नवीन नियम. या नियमांमुळे इंडिगोला कर्मचाऱ्यांची अचानक कमतरता भासू लागली. एअरलाईन्सना नियमांच्या अंमलबजावणीसाठी 18 महिन्यांची मुदत दिली होती, परंतु इंडिगोनं वेळेत भरती केली नाही. यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, नागरिक वेठीस धरले गेले आहेत. प्रवाशांचे हाल पाहून DGCA ने हे नियम तात्पुरते मागे घेतले असून, केंद्र सरकारने रद्द झालेल्या उड्डाणांच्या प्रवाशांना तत्काळ पैसे परत करण्याचे निर्देश दिले आहेत.
