Manoj Jarange : जालन्याचे SP धनंजय मुंडे यांना ताब्यात का घेत नाही? जर त्यांना अटक न केल्यास… जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवर अडीच कोटींची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. जरांगेंनी मुंडेंच्या अटकेची मागणी करत, कारवाई न झाल्यास वाईट परिणामांचा इशारा दिला. या आरोपांवर मला काहीही बोलायचं नाही, एसआयटी पारदर्शकपणे काम करत आहे, असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या म्हणण्यानुसार, धनंजय मुंडेंनी त्यांच्या घातपातासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिली होती. या संदर्भात जरांगे पाटलांनी जालन्याचे पोलीस अधीक्षक धनंजय मुंडेंना अटक का करत नाहीत, असा सवाल उपस्थित केला आहे. जर मुंडेंना अटक झाली नाही, तर याचे वाईट पडसाद उमटतील, असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला आहे.
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी थेट बोलण्यास नकार दिला. “मला यावर काहीही बोलायचं नाही,” असे मुंडे म्हणाले. तसेच, “एसआयटी नेमलेली आहे आणि एसआयटी पूर्णपणे पारदर्शकपणाने काम करते आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. कोण काय आरोप करतो यापेक्षा आपण आपले काम सरळ-सरळ करत असल्याचे मुंडे यांनी नमूद केले. जरांगे आणि मुंडे यांच्यातील या आरोप-प्रत्यारोपांमुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
