ENG vs IND : ओव्हलमध्ये भारताचा थरारक विजय, इंग्लंडवर 6 धावांनी मात, मालिका 2-2 ने बरोबरीत
हॅरी ब्रूक आणि जो रूट यांच्या शतकांमुळे इंग्लंड विजयाच्या उंबरठ्यावर होता. पण तिसऱ्या सत्रात प्रसिद्धच्या दमदार गोलंदाजीने भारताचं कमबॅक झालं आणि नंतर शेवटच्या दिवशी सिराजने इंग्लंडचा डाव उधळून लावला.
ओव्हलच्या ऐतिहासिक मैदानावर टीम इंडियाने आपल्या विजयाची आणखी एक झालर चढवत अविस्मरणीय विजय मिळवला आहे. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने आपल्या जबरदस्त गोलंदाजीमुळे टीम इंडियाने थरारक सामन्यात इंग्लंडकडून विजय हिसकावून घेतल्याचे पाहायला मिळाले आणि ओव्हल कसोटीत इंग्लंडवर 6 धावांनी मात केली. सिराजने दुसऱ्या डावातील 5 विकेट्ससह सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आणि टीम इंडियाच्या विजयाचा स्टार फेस बनला. तर शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत पिछाडीवर पडल्यानंतर आता 2-2 अशी बरोबरी साधली आहे.
कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी, इंग्लंडला 35 धावांची तर भारताला 4 विकेट्सची आवश्यकता होती. पाचव्या दिवसाच्या पहिल्याच षटकात, जेमी ओव्हरटनने 2 चौके ठोकत इंग्लंडसाठी दमदार सुरुवात केली, मात्र पुढच्याच ओव्हरमध्ये सिराजने जेमी स्मिथला बॅक टू पॅव्हेलियन करत आजचा सामना रोमांचक बनवला. त्यानंतर सिराजने पुढच्या ओव्हरमध्ये जेमी ओव्हरटनला परत पाठवले आणि भारताला विजयाच्या अगदी जवळ आणले. असा पुढे सामना रोमांचक बनत अखेरच्या टप्प्यात भारताचा दणदणीत विजय झाला.
