Gunaratna Sadavarte : राज ठाकरेंना अटक करा, सामान्य माणूस असुरक्षित अन्… गुणरत्न सदावर्तेंचा घणाघात
राज ठाकरे देश हिताच्या विरोधात बोलत आहेत, मुंबई पोलिसांनी कोणताही विलंब न करता त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असं वक्तव्य करत सदावर्ते यांनी तातडीने राज ठाकरेंच्या अटकेची मागणी केली आहे.
गुन्हेगारीची भाषा करणाऱ्या राज ठाकरेंना नोटीस द्या, असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी पोलीस आयुक्तांकडे ही विनंती केली आहे. तर राज ठाकरे यांना अटक न केल्यास सामान्य माणूस असुरक्षित असल्याचे गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहे. ‘डुबा डुबा के मारेंगे असं म्हटल्यानंतर जर राज ठाकरे आरोपी होत नसतील, त्यांच्यावर थेट एफआयर होत नसेल तर मला विनम्रपणे पोलीस आयुक्तांना असं म्हणायचंय की एक गुन्हेगारीची भाषा करणाऱ्या राज ठाकरेंना आपण नोटीस देणार आहात? देणार असाल तर लवकरात लवकर द्या. लोकांचा कायद्यावर विश्वास वाढला पाहिजे. राज ठाकरेंना अटक केली पाहिजे. असं नाही झालं तर सामान्य माणूस असुरक्षित आहे.‘, असं वक्तव्य करत यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंच्या अटकेची मागणी केली आहे. राज ठाकरेंच्या बाबतीत जेवढे बोलावे, जेवढी निंदा करावी, जेवढा त्यांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. राज ठाकरे यांचे लाड बंद करावेत, देशाला, राज्याला महाराष्ट्राच्या अर्थकरणाला हे हानिकारक आहे, असं म्हणत सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर घणाघात केलाय.
