NCP BIG Breaking : जयंत पाटलांकडून पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, पुढील सूत्र कोणाकडे?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष पदावरून निवृत्ती द्या असे जयंत पाटलांनी म्हणत आपल्या राजीनामा देण्याचे संकेत दिले होते. अखेर त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जयंत पाटलांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद सोडलं आहे. यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची पुढील सूत्र शशिकांत शिंदे यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. येत्या मंगळवारी शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असणार आहे. दरम्यान, येत्या मंगळवारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची यासंदर्भात एक बैठक देखील होणार आहे.
राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर जयंत पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडली नाही. त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा होती. मात्र आता या जबाबदारीतून मुक्त करावे असे बऱ्याच वेळा जयंत पाटलांकडून सांगण्यात आले होते. तर राष्ट्रादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचे संकेत देण्यात आले होते. त्यामुळे गेले बरेच दिवस राजकीय वर्तुळात खांदेपालट होणार का अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर जयंत पाटील हे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार झालेत.
