Kalyan Politics : जेव्हा युती तेव्हा गद्दारी, नरेंद्र पवारांचं अरविंद मोरेंना प्रत्युत्तर; कल्याण-डोंबिवलीतील राजकीय घमासान
कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना आणि भाजपमध्ये तीव्र राजकीय संघर्ष सुरू आहे. शिवसेनेचे अरविंद मोरे यांनी भाजपला आव्हान दिले असताना, भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. युती झाली की शिवसेनेने गद्दारी केली आणि स्वबळावर लढताना आडवे आले, असा आरोप पवार यांनी केला.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार राजकीय वाद सुरू झाला आहे. शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपला थेट आव्हान देत म्हटले आहे की, “याल तर सोबत नाहीतर आडवे करू.” मोरे यांनी भाजपला युतीसाठी तयार राहण्याचे किंवा अडथळ्यांना सामोरे जाण्याचे स्पष्ट संकेत दिले. या आव्हानाला भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
नरेंद्र पवार यांनी अरविंद मोरे यांना उद्देशून सांगितले की, “जेव्हा जेव्हा युती झाली, तेव्हा तेव्हा तुम्ही गद्दारी केली.” यामुळे भाजपचे अनेक कार्यकर्ते अडचणीत आले, असे ते म्हणाले. आपण स्वतः त्यापैकी एक बळी असल्याचेही त्यांनी नमूद केले. इतकेच नाही, तर जेव्हा भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली, तेव्हा शिवसेनेने भाजपला आडवे केले, असेही त्यांनी म्हटले. त्यामुळे भाजपने आडवे करण्याची भाषा अरविंद मोरे यांनी वापरू नये, असं चॅलेंजचं नरेंद्र पवार यांनी दिलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच युतीबद्दल निर्णय घेतील, असे सांगत, मोरेंचा अभ्यास कमी असल्याचेही पवार यांनी म्हटले.
