Ladaki Bahin Yojana : कुणी नेटवर्क देतं का नेटवर्क… लाडक्या बहिणी E-KYC साठी थेट डोंगरावर! 1500 रू. साठी काय पण!

| Updated on: Oct 10, 2025 | 3:55 PM

नंदुरबारमधील धडगाव तालुक्यातील खर्डी खुर्द गावातील महिला इ-केवायसी करण्यासाठी डोंगराच्या झाडावर मोबाईल बांधून ठेवून नेटवर्क शोधत आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभ घेण्यासाठी सातपुड्यातील महिलांची इ-केवायसीसाठी मोठी कसरत होत आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी इ-केवायसी अनिवार्य असलेल्या प्रक्रियेसाठी नर्मदा काठावरील खर्डी खुर्द (ता. धडगाव) गावातील महिलांना डोंगरावर चढाई करावी लागत आहे. गावात नेटवर्क असूनसुद्धा इंटरनेटची सुविधा अत्यंत कमकुवत असल्याने ‘लाडक्या बहिणीं’ना हे काम पूर्ण करण्यासाठी डोंगरावर तासनतास बसावे लागत आहे.

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी ई- केवायसी बंधनकारक केल्यामुळे खर्डी खुर्द येथील महिलांची मोठी अडचण झाली आहे. या प्रक्रियेसाठी मोबाईल नेटवर्क व जलद इंटरनेट आवश्यक असते. परंतु गावात चांगली सुविधा नसल्याने महिलांना गाव सोडून नर्मदा काठावरील उंच टेकडीवर जावे लागते. टेकडीवरही नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्याने अनेक महिला झाडाच्या फांद्यांवर काठीला मोबाईल बांधून ठेवतात, जेणेकरून सिग्नल मिळून ई-केवायसी पूर्ण होईल. एका बाजूला मोबाईल झाडावर व दुसऱ्या बाजूला नेटवर्क मिळण्याची वाट पाहत महिला बसून असतात.

Published on: Oct 10, 2025 03:55 PM