Bhushan Gavai Attack : सरन्यायाधीशांवर बूट फेकला पण पश्चाताप नाही! ‘त्या’ वकिलाची मुजोरी कायम, म्हणाले माफी…
सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकील राकेश किशोरने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर राकेश किशोरने पश्चाताप नसल्याचे आणि माफी मागणार नसल्याचे म्हटले आहे. गवईंच्या विष्णू देवतेसंबंधीच्या टिप्पणीमुळे संतापलेल्या वकिलाच्या या कृतीचा महाराष्ट्रासह देशभरात निषेध नोंदवला गेला, विविध राजकीय पक्षांनी निदर्शनं केली.
सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकील राकेश किशोरने बूट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, या घटनेनंतर राकेश किशोरने आपल्याला कुठलाही पश्चाताप नसून माफी मागणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. “परमात्माने जे घडवून आणले ते मी केले, मी केवळ साक्षीदार आहे,” असे त्याने म्हटले आहे.
न्यायमूर्ती गवई यांनी एका विष्णू मंदिराच्या सुनावणीदरम्यान “तुमच्या तक्रारीसाठी भगवान विष्णूकडे जा” अशी टिप्पणी केली होती, ज्यावरून हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला होता. याच टिप्पणीमुळे संतापलेल्या राकेश किशोरने हे कृत्य केले. त्याने “आपलं अस्तित्व धोक्यात असताना सनातनींनी शांत राहू नये,” असेही म्हटले आहे.
या हल्ल्याच्या प्रयत्नाचा देशभरातून तीव्र निषेध झाला असून, महाराष्ट्रात अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बारामती आणि कोल्हापूरसह अनेक ठिकाणी निदर्शनं करण्यात आली. अमरावतीत काँग्रेसनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शनं करत वकील राकेश किशोरवर कारवाईची मागणी केली. त्याच्या कृतीविरोधात त्याची सनद निलंबित करण्यात आली असून, त्याच्यावर खटलाही दाखल करण्यात आला आहे.
