Assembly Session : विद्यार्थिनींची विवस्त्र करून चौकशी; विधानसभेत प्रकरण गाजले, विरोधकांचा सरकारवर दबाव
Maharashtra Assembly Session : शहापूर येथील शाळेत विद्यार्थिनींना मासिक पाळी तपासण्याच्या नावाखाली विवस्त्र केल्याचा धक्कादायक मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला.
शहापूर येथील एका शाळेत मुख्याध्यापिकेने विद्यार्थिनींना मासिक पाळी तपासण्याच्या नावाखाली विवस्त्र केल्याचा धक्कादायक मुद्दा आज महाराष्ट्र विधानसभेत उपस्थित झाला. काँग्रेस नेते नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हा विषय सभागृहात मांडत कठोर कारवाईची मागणी केली. यावर सरकारने सभागृहाला माहिती दिली की, या प्रकरणी मुख्याध्यापिकेला अटक करण्यात आली असून, पुढे कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली.
याचवेळी, नाना पटोले यांनी आदिवासी आणि मागासवर्गीय आश्रमशाळांमधील आरोग्य सुविधांचा मुद्दाही उपस्थित केला. ते म्हणाले की, सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी डॉक्टरांना पगार दिला जातो, परंतु अनेक डॉक्टर वेतन घेऊनही आरोग्य सेवा पुरवत नाहीत, ही अत्यंत गंभीर बाब आहे. पटोले यांनी एका घटनेचा उल्लेख करत सांगितले की, एका आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या शरीरावर चट्टा आढळल्यानंतर त्याचे प्रमाण वाढले. उपचारादरम्यान दिलेल्या औषधांच्या दुष्परिणामामुळे त्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, असे मंत्री महोदयांनी सभागृहात सांगितले.
पटोले यांनी यावर प्रश्न उपस्थित केला, हे डॉक्टर खरोखरच प्रशिक्षित आहेत का? त्यांचा वैद्यकीय क्षेत्राशी संबंध आहे का? आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा जीव जाणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. सरकारने याकडे गांभीर्याने पाहावे आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना करावी. त्यांनी सरकारला या प्रकरणात स्पष्ट आणि कठोर धोरण आखण्याची मागणी केली.
