NCP : कोकाटेंचं मंत्रिपद वाचलं पण खातं बदललं, आता मुंडेचं लॉबिंग अन् भेटीगाठी सुरू पुन्हा मंत्री होणार?

NCP : कोकाटेंचं मंत्रिपद वाचलं पण खातं बदललं, आता मुंडेचं लॉबिंग अन् भेटीगाठी सुरू पुन्हा मंत्री होणार?

| Updated on: Aug 01, 2025 | 11:33 AM

कोकाटेंना मंत्रीपदावरून हटवायचं नाही हे निश्चित झाले आहे. पण खात्यात माज्ञ बदल करण्यात आलाय. कोकाटेंचं कृषी खाते काढून क्रीडा खातं त्यांना देण्यात आलंय. तर दुसरीकडे धनंजय मुंडेंच्याही पुन्हा एकदा मंत्रीपदासाठी हालचाली सुरू झाल्याचं दिसतंय.

अजित पवारांचे मंत्री माणिकराव कोकाटेंचं मंत्री पद वाचणार असलं तरी खात्यात मात्र बदल करण्यात आलाय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. ज्यात कोकाटेंचं खाते काढून घेण्याचा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे. कोकाटे यांच्याकडे सध्या कृषी खाते आहे. हे कृषी खाते दादांचेच मंत्री दत्ता मामा भरणे यांना देण्यात आलं आहे. तर भरणे यांच्याकडील क्रिडा आणि युवक कल्याण खाते कोकाटेंना दिलं असून कोकाटेंना मंत्रिमंडळात एक प्रकारे साईड पोस्टिंग देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

एक दिवस आधीच रोहित पवारांनी कोकाटेंच्या रमीच्या व्हिडिओवरून आणखी एक ट्वीट करत नवा धमाका केला. ज्यात चौकशी अहवाल आल्यासून १८ ते २२ मिनिट कोकाटे रमी खेळत होते असा ठपका ठेवण्यात आल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय. त्यानंतर पुन्हा एकदा कोकाटेंवरून घडामोडी घडल्या. चौकशीत आपण दोषी आढळल्यास राजीनामा देण्याची तयारी कोकाटेंनी याआधीच दर्शवली आहे.

दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या भेटीगाठींनी भुवया उंचावल्या. मंत्रीपदासाठी मुंडेनी लॉबिंग सुरू केल्याचं दिसतंय. बुधवारी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि मुंडे यांच्यात बैठक झाली. कृषी खरेदीत घोटाळ्याच्या आरोपात मुंबई हायकोर्टाकडून मुंडेंना क्लिनशीट मिळाली आहे. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मीक कराड संदर्भात अद्याप मुंडेंचं चार्जशीटमध्ये नाव आलेलं नाही. त्यामुळे धनंजय मुंडेंकडून हालचाली सुरू झाल्या. मात्र पुरवणी आरोपपत्र अद्याप बाकी असून आरोपींना मुंडेंचे ४० पेक्षा अधिक कॉल आल्याचा दावा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलाय.

Published on: Aug 01, 2025 11:32 AM