परमीट रुम्स, बार बंद, ड्राय डेमुळे तळीरामांचा वांधा
राज्य सरकारच्या मद्यावरील करवाढीच्या निर्णयाविरोधात हॉटेल आणि बार मालकांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे.
महाराष्ट्रातील हॉटेल आणि बार मालकांनी राज्य सरकारच्या मद्यावरील करवाढीच्या निर्णयाविरोधात आज राज्यव्यापी संप पुकारला आहे. या बंदमध्ये सुमारे 22 हजार हॉटेल्स आणि बार सहभागी होणार असून, याचा हॉस्पिटॅलिटी क्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे खवय्ये आणि मद्यप्रेमी यांना खाण्यापिण्याच्या सुविधांपासून वंचित राहावे लागेल.
करवाढीमुळे हॉटेल आणि बार मालकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याने हा संप आयोजित करण्यात आला आहे. हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाच्या माहितीनुसार, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, लोणावळा, महाबळेश्वर, पालघर आणि वसईसह अनेक शहरांतील स्थानिक हॉटेल संघटनांनी बार आणि मद्यसेवा बंद ठेवण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रातील पर्यटन आणि व्यावसायिक आतिथ्य क्षेत्राला आधार देणाऱ्या रेस्टॉरंट्स आणि बारवर या करवाढीचा गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. यामुळे महाराष्ट्र हा देशातील बार चालवण्यासाठी सर्वात महागडा राज्य ठरू शकतो, ज्याचा फटका पर्यटकांसह स्थानिक व्यावसायिकांना बसू शकतो, अशी चिंता असोसिएशनने व्यक्त केली आहे
