ठाकरे शिंदे भांडतायत… इकडे ठाकरे फडणवीस भेटतायत, ऑफर दिल्यानंतर 30 मिनिटं खलबतं; नेमकी चर्चा काय?
गेल्या दोन दिवसात विधानभवनात शिंदे आणि ठाकरेंमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीगाठी सुद्धा सुरू आहेत. अर्धा तास उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये चर्चा झाली आहे.
ठाकरे शिंदे भांडतायत…ठाकरे फडणवीस भेटतायत, गेल्या दोन दिवसात हेच चित्र आहे. दोन दिवसात मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये तीन वेळा भेटीगाठी झाल्यात. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंना सोबत येण्याची ऑफर दिल्यानंतर फडणवीस आणि ठाकरेंमध्ये अर्धा तास अँटी चेंबरमध्ये भेट झाली.
मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेमध्ये खलबत झालीत. भास्कर जाधवांचे विरोधी पक्षनेते पद, त्रिभाषा सूत्र आणि हिंदी सक्तीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. तर हिंदी सक्ती हवीच कशाला? हे पुस्तक उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना दिले. हेच पुस्तक समितीचे अध्यक्ष नरेन्द्र जाधवांना द्यावे असे ठाकरे म्हणाले. गेल्या दोन दिवसांत ठाकरे आणि फडणवीसांच्याही भेटीगाठी वाढल्यात. याआधी विधीमंडळाच्या परिसरातही दोघे भेटलेत. त्यानंतर अंबादास दानवेंच्या निरोप समारंभाच्या फोटो सेशनच्या वेळी या दोघांची भेट झाली. दरम्यान फोटो काढल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचे लक्ष वेधून घेत भेट घेतली आणि आता मुख्यमंत्र्यांच्या अँटी चेंबरमध्ये अर्धा तास दोन्ही नेते भेटलेत.
