Ajit Pawar NCP : फुटलेली राष्ट्रवादी अजून फुटणार? बंडखोर गटातच पुन्हा नवं बंड? अनेक जण घड्याळ सोडून कमळाच्या वाटेवर?
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गट पुन्हा फुटण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. अनेक माजी आमदार आणि नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत, तर काही नेत्यांचे सूर अजित पवारांविरोधात दिसताहेत. यामुळे अजित पवार गटासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा गट पुन्हा एकदा राजकीय बंडाळीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार गटात आता दुसरी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माढ्यातील माजी आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे दोन्ही पुत्र रणजीतसिंह शिंदे, विक्रमसिंह शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. मोहोळमधील राजन पाटील आणि यशवंत माने यांच्याही भाजप प्रवेशाची चर्चा आहे.
जळगावच्या पाचोऱ्यातील दिलीप वाघ यांनी तर यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याचबरोबर, नगरमधील आमदार संग्राम जगताप पुढची निवडणूक भाजपमधून लढतील, असा आरोप रोहित पवारांनी केला आहे. मंत्री छगन भुजबळ यांचे सूरही अजित पवारांच्या विरोधात असल्याचे दिसून येत आहे. धनंजय मुंडे हे देखील भाजपच्या जवळ असल्याची चर्चा आहे. सोलापूर जिल्ह्यातील चार माजी आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे. भाजपने आपल्या विरोधकांना पक्षात सामील करून घेण्याची नीती अवलंबल्याचा आरोपही होत आहे.
