Maharashtra Rain : कोकण किनारपट्टी, घाटमाथ्यासह काही जिल्ह्यात पावसाचं थैमान, मुंबई अन् महाराष्ट्राला IMD चा अलर्ट, येत्या 4 दिवसांत…
राज्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली आहे. तर मुंबईतील आकाशात काळे ढग दाटून आल्याचे पाहायला मिळत आहे. अशाचत हवामान खात्यानं काय वर्तविला अंदाज?
राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिकच वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच हवामान खात्याकडून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वुरूपाच्या पावसाचा अनुभव येणार आहे. त्यामुळे दैनंदिन कामकाजावर फारसा परिणाम होण्याची शक्यता सध्यातरी दिसत नाही. तर दुसरीकडे भारतीय हवामान विभाग आणि महासागर माहिती सेवा केंद्राने लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच पूरपरिस्थितीमुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून याठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
