Maharashtra Rain : आज धुव्वाधार…राज्यात कुठे मुसळधार पाऊस, IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Rain : आज धुव्वाधार…राज्यात कुठे मुसळधार पाऊस, IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

| Updated on: Jul 26, 2025 | 12:39 PM

राज्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. ज्या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला त्या जिल्हांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अशात हवामान खात्याने सतर्क राहण्याचा इशारा दिलाय.

राज्यभरात पावसाचा कहर पाहायला मिळतोय. पालघर, पुणे, गोंदिंया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, मुंबईमध्ये पावासाचा जोर कायम आहे. वसई विरारसह पालघर जिल्ह्यात आज दिवसभर हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असून तानसा नदीला काही प्रमाणात पूर आला आहे. तर चंद्रपूर जिल्ह्याला आज सलग दुसऱ्या दिवशी हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट दिलाय. काल देखील हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्याला रेड अलर्ट दिला होता मात्र पावसाने हुलकावणी दिली असून केवळ रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जिल्ह्यात बरसत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हवामान खात्याच्या वतीने गोंदिया जिल्ह्याला देखील सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. रात्रीपासून सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू झाला असून गोंदिया जिल्ह्यातील बेवारटोला प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. तर इतर धरणांमधून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याच्या विसर्ग सुरू असल्याने अनेक शेती पाण्याखाली गेली आहे.

अशातच पालघर, पुणे गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर तिकडे विदर्भात नागपूर, भंडारा, गडचिरोली, अमरावतीला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.

Published on: Jul 26, 2025 12:39 PM