Maharashtra Weather : महाराष्ट्रात मान्सून दाखल मात्र विदर्भ प्रतिक्षेत, कधीपर्यंत वाट पाहवी लागणार? हवामान खात्यानं म्हटलं…
विदर्भात सध्या तापमानामध्ये मोठी वाढ झाली असून साधारणता 40 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचलेलं आहे. 12 तारखेनंतर साधारणतः पावसाचा अंदाज दिसून येत आहे त्यामध्ये पाऊस हा सर्वसाधारण राहिला तरी हवेचा जोर मात्र मोठा राहणार आहे
महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला मात्र विदर्भात मान्सूनच्या पावसासाठी 12 तारखेपर्यंत वाट पहावी लागणार आहे. विदर्भातील गडचिरोलीच्या काही भागात दाखल झालेला मान्सून रखडला असल्याचे पाहायला मिळत आहे. मान्सून रखडल्याने तापमानात झाली मोठी वाढ झाली असून काही भागात 43 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहचलं आहे. तर 12 तारखेपर्यंत तापमानात वाढ सुरूच राहणार आहे. यासोबतच उकाडा काय राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, 12 तारखेला पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलाय. पाऊस साधारण राहणार मात्र वादळी वाऱ्याचा जोर मोठ्या प्रमाणात असण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मान्सूनची विदर्भात तारीख साधारणतः 10 ते 15 जून असते मात्र यावेळी मान्सून लवकर दाखल झाला असला तरी त्यानंतर अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकली नाही त्यामुळे मान्सून रखडला असल्याचे हवामान खात्यानं सांगितलंय. बंगालच्या खाडीतून किंवा अरबी समुद्रातून पावसाला पूरक वातावरण निर्माण होत नसल्याने उत्तरेकडून गरम वारे येत असल्याने तापमानात वाढ झाली आहे. तर शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये चांगल्या पावसाची वाट पहावी आणि हवामान विभाग वेळोवेळी या संदर्भामध्ये माहिती देत राहील त्यावर लक्ष ठेवावं असा सल्ला नागपूर हवामान विभागाने दिला आहे.
