Mahayuti Internal Discord : महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर, दादा गट अन् शिंदे गटानं भाजपसह मित्रपक्षांनाही दिला इशारा

Mahayuti Internal Discord : महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर, दादा गट अन् शिंदे गटानं भाजपसह मित्रपक्षांनाही दिला इशारा

| Updated on: Oct 14, 2025 | 11:00 AM

महाराष्ट्रातील महायुतीमध्ये स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. धर्मराव अत्राम यांनी भाजपवर विधानसभा निवडणुकीत डमी उमेदवार उभा केल्याचा आरोप केला. कल्याण, बदलापूर आणि जळगावमध्ये शिंदे गट आणि अजित पवार गटाकडूनही मित्रपक्षांना इशारे दिले जात आहेत, ज्यामुळे युतीतील तणाव स्पष्ट दिसत आहे.

महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीत स्थानिक निवडणुकांपूर्वीच अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. मित्रपक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि जागावाटपावरून तीव्र मतभेद समोर येत आहेत. गडचिरोलीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) दादा गटाचे माजी मंत्री धर्मराव अत्राम यांनी भाजपने त्यांच्या विरोधात ५ कोटी रुपये देऊन पुतण्याला विधानसभा निवडणुकीत उभे केल्याचा गंभीर आरोप केला. १९ जागांवर स्वबळावर लढण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

याचबरोबर, कल्याणमध्ये शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी भाजपने युती न केल्यास आडवे करून लढण्याचा इशारा दिला आहे. बदलापूरमध्ये भाजप आणि अजित पवार गटानं युती जाहीर करताना शिंदे गटाला बाजूला सारले. जळगावमध्येही अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटलांनी महायुती न झाल्यास ताकद दाखवण्याचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र आल्याचे सांगणाऱ्या या नेत्यांकडूनच आता एकमेकांना इशारे दिले जात असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Published on: Oct 14, 2025 11:00 AM