Delhi Lal Quila Blast : दिल्ली स्फोटातील ‘ती’ i-20 कार नेमकी कोणी-कोणी वापरली? मालक कोण? पुलवामाशी काय कनेक्शन?
दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात i20 हुंडाई कारमध्ये भीषण स्फोट होऊन ९ जणांचा मृत्यू झाला, तर ३० हून अधिक जखमी झाले. स्फोटानंतर परिसर हादरला, अनेक वाहनांना आग लागली. घटनेनंतर दिल्ली, मुंबईसह अनेक शहरे हाय अलर्टवर आहेत. पोलीस कार मालकांचा शोध घेत असून, पुलवामा संबंधाची शक्यता तपासत आहेत.
दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात एका i20 हुंडाई कारमध्ये भीषण स्फोट होऊन ९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३० हून अधिक व्यक्ती जखमी झाल्या आहेत. संध्याकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी हा स्फोट झाला. स्फोटानंतर शेजारील अनेक वाहनांना आग लागली आणि परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जखमींवर एलएनजेपी (LNJP) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर दिल्ली, मुंबईसह अनेक शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनेच्या सखोल तपासाचे निर्देश दिले आहेत.
पोलिसांनी कारच्या मालकांचा शोध सुरू केला आहे. i20 चा जुना मालक मोहम्मद सलमान याला गुरुग्राम पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. सलमानने दीड वर्षांपूर्वी ही कार ओखला येथील देवेंद्र नावाच्या व्यक्तीला विकली होती. त्यानंतर देवेंद्रने ती हरियाणाच्या अंबाला येथील नदीम खानला विकली. नदीम खानकडून तारीक नावाच्या व्यक्तीने ती रॉयल कार झोन हरियाणा येथून खरेदी केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तारीक हा पुलवामा येथील शंभुरा गावाचा रहिवासी असण्याची शक्यता आहे. पोलीस या स्फोटाचा पुलवामाशी काही संबंध आहे का, याचीही चाचपणी करत आहेत. एक संशयित पोलिसांच्या ताब्यात असून, पुढील तपास सुरू आहे.
