Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची 17 वर्षांनंतर सुनावणी पूर्ण, आज निकाल काय लागणार? मालेगावसह देशाचं लक्ष
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आज निकाल लागण्याची शक्यता आहे. मुंबईच्या एनआयए विशेष न्यायालयात निकाल लागणार असल्याची माहिती आहे. या निकालाकडे मालेगावसह देशाचं लक्ष लागले आहे.
मालेगावात 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुमारे 17 वर्षानंतर अखेर पूर्ण झाली आहे. विशेष एनआयए न्यायालयाने सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकाल सुरक्षित ठेवला होता. संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी आहे. मालेगाव बॉम्बस्फोटात सहा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 100 पेक्षा अधिक जखमी झाले होते. घटनास्थळी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या मालकीची मोटरसायकल सापडली होती. यापूर्वी साध्वी प्रज्ञासिंह यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. खटल्यातील सर्व आरोपींना 31 जुलै रोजी न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले.
सरकारी वकिलांनी 323 साक्षीदारांची चौकशी केली, त्यापैकी 37 जण जबाबावरून फिरले. प्रकरणाचा तपास प्रथम एटीएस आणि नंतर एनआयएकडे सोपवण्यात आला होता. यूएपीएच्या कलम 16 (दहशतवादी कृत्ये) आणि 18 (दहशतवादी षडयंत्र रचणं), आयपीएसच्या कलम 120 बी (गुन्हेगारी षडयंत्र), 302 (हत्या), 307 (हत्येचा प्रयत्न), कलम 324 (दुखापत करणे) आणि 153 ए (दोन धार्मिक गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) या कलमांतर्गत आरोप निश्चिती झाली आहे.
