Manikrao Kokate : कोकाटे यांचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत, मात्र….

| Updated on: Dec 19, 2025 | 12:05 PM

माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, नाशिक पोलीस त्यांना अटक करण्यासाठी लीलावती रुग्णालयात तीन तास होते, मात्र अटक झाली नाही. शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी कोकाटेंनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.

माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनंतर मंजूर केला आहे. दुसरीकडे, नाशिक पोलीस माणिकराव कोकाटेंना अटक करण्यासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात पोहोचले होते. जवळपास तीन तास पोलीस रुग्णालयात उपस्थित होते, त्यांनी रुग्णालयातील डॉक्टर कुलदीप देवरे यांचा जबाब नोंदवला आणि कोकाटेंच्या उपचारांबाबत माहिती घेतली. मात्र, डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या अँजिओग्राफी होणे अपेक्षित असून, त्यानंतरच अटकेसंदर्भात निर्णय घेतला जाईल असे पोलिसांनी सांगितले. परिणामी, अद्याप कोकाटेंना अटक झालेली नाही. नाशिक जिल्हा न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी, यासाठी माणिकराव कोकाटेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीत न्यायालय काय आदेश देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाच्या पुढील घडामोडी आजच्या न्यायालयीन निर्णयानंतर स्पष्ट होतील.

Published on: Dec 19, 2025 12:05 PM