Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर…
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. सरकारने केलेली चूक मान्य करून ती तातडीने दुरुस्त करावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत मराठा समाजाच्या मागण्यांवरून सरकारला धारेवर धरले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. सरकारने केलेली चूक मान्य करून ती तातडीने दुरुस्त करावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत मराठा समाजाच्या मागण्यांवरून सरकारला धारेवर धरले.
“सरकार उपसमितीच्या किती बैठका घेणार आहे? अजून समाजाला काय देताय?” असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर केवळ बैठका घेऊन उपयोग नाही, तर प्रत्यक्ष निर्णय घेऊन समाजाला न्याय देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबीयांसाठी ऊर्जा खात्याचा साधा जीआरही सरकारला काढता आला नाही, अशी टीका जरांगे यांनी केली. “काय नाक उचलून फडणवीस बोलणार आहेत? दरवेळी छत्रपतींचं नाव घेताय, पण जी चूक केली त्याबद्दल बोला,” असा घणाघात त्यांनी केला.
सरकारने केलेली चूक मान्य करून पुन्हा प्रमाणपत्रे द्यावीत, अशी मागणीही त्यांनी केली. “लोकांचा रोष कमी होईल. प्रमाणपत्रं पुन्हा द्या. सरकारचा तिरस्कार आता वाढत चालला आहे, तो वाढू देऊ नका,” असे जरांगे पाटील म्हणाले. सरकारने मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात हिणवल्याचा आरोपही त्यांनी केला. “तीन वर्षांत किती मोर्चे झाले आणि तीन वर्षांत काय दिलं?” असा सवाल करत त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शेतकरी, मुस्लिम आणि ओबीसी समाजामध्येही सरकारविरोधात तिरस्कार निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, मराठा समाजाकडून पुन्हा मुंबईला जाण्याचा विचार सुरू असल्याचे संकेतही मनोज जरांगे पाटील यांनी दिले. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा पुन्हा मुंबईकडे वळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आपल्याला अनेक मराठा नेते, आमदार आणि खासदार फोन करून आपण मांडत असलेली भूमिका योग्य असल्याचे सांगत असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला. “राणेंसारखे अनेक मराठा नेते आता बोलू लागले आहेत, याचं स्वागत आहे. सरकारचा माज उतरला जातोय,” असेही ते म्हणाले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेवरूनही जरांगे पाटील यांनी भाष्य केले. “वडेट्टीवारांना माझ्यावर बोलायला राहुल गांधींनी सांगितलं आहे का?” असा सवाल त्यांनी केला. तसेच, “बोटावर मोजण्याइतकी काँग्रेस राहिली आहे, तीही संपवू नका,” असा टोला त्यांनी लगावला.
मनोज जरांगे पाटील यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे. सरकार यावर काय भूमिका घेते आणि मराठा समाजाच्या मागण्यांबाबत पुढील निर्णय काय घेतला जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
