उन्हाच्या तडाख्यात आमरण उपोषण… जरांगे पाटील ठाम! आश्वासनांना थेट नकार, नेमक्या मागण्या काय?
अंतरवाली सराटी: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा निर्णय घेतला असून सरकारकडून लेखी आश्वासन आणि अंमलबजावणीसाठी ठोस कालावधी जाहीर होईपर्यंत मागे हटणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा निर्णय घेतला असून सरकारकडून लेखी आश्वासन आणि अंमलबजावणीसाठी ठोस कालावधी जाहीर होईपर्यंत मागे हटणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. काल राज्याचे महसूल मंत्री तथा मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळाने अंतरवाली सराटीत जरांगे पाटील यांची भेट घेऊन मागण्यांबाबत चर्चा केली. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्तालयात आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली होती.
या बैठकीत मराठा–कुणबी प्रमाणपत्र वाटप प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. मात्र 58 लाख कुणबी नोंदी असूनही त्या प्रमाणात प्रमाणपत्रे का वितरित झाली नाहीत आणि वाटप थांबवण्याचे आदेश कोणी दिले, यावरून जरांगे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारने केवळ आश्वासन देऊ नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या:
* स्वतंत्र मराठा मंत्रालय स्थापन करून लेखी आश्वासन द्यावे
* मंत्रीमंडळ उपसमिती तात्काळ बरखास्त करावी
* सातारा संस्थान गॅझेटनुसार आरक्षणाचा शासन निर्णय जारी करावा
* मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र तातडीने द्यावे
* कुणबी प्रमाणपत्र वाटप नोंदी ग्रामपंचायत स्तरावर नोंदवाव्यात
* मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे सरसकट मागे घ्यावेत
* अंतरवाली सराटी लाठीचार्ज प्रकरणातील पोलिसांवर गुन्हे दाखल करावेत
* आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरी द्यावी
आज सकाळी 10 वाजता मनोज जरांगे पाटील भरउन्हात आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती असून, उपोषण सुरू करण्यापूर्वी ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
दरम्यान, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे पुन्हा अंतरवाली सराटीत दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपोषणापूर्वी ते प्रत्यक्ष भेट घेणार का, की फोनवरून संवाद साधणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.