Manoj Jarange Patil | एसीत सरकार, उन्हात मराठा समाज; जरांगेंचा सरकारला अखेरचा इशारा, उद्याचं आंदोलन फायनल?

| Updated on: May 29, 2026 | 11:43 AM

मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. अंतरवाली सराटी येथे उद्यापासून सुरू होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत आणि आमदार बच्चू कडू यांच्यासह सरकारचे प्रतिनिधी जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी दाखल होणार आहेत.

दरम्यान, आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करत आता केवळ आश्वासन नको, तर ठोस निर्णय हवा असल्याचं स्पष्ट केलं. “उद्याचं आंदोलन होणारच, आता माघार नाही,” असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिला.
जरांगे पाटील म्हणाले, “सरकारला आम्ही भरपूर वेळ दिला. 29 ऑगस्टपासून 29 मेपर्यंत तब्बल दहा महिने वाट पाहिली. त्याआधीही तीन वर्ष आम्ही शांततेत थांबलो. पण अजूनही केवळ वेळकाढूपणा आणि चालढकल सुरू आहे.” मराठा आंदोलकांवरील गुन्ह्यांच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सांगितलं की, “1500 पैकी 834 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. आता सरकार 64 गुन्हे शिल्लक असल्याचं सांगत असेल तर त्यांची भूमिका ऐकून पुढील निर्णय घेऊ.” यावेळी त्यांनी सरकारवर भावनिक शब्दांत टीकाही केली. “उन्हात बसून उपोषण करणं हा आमचा छंद नाही. सरकार एसीत बसलं आहे आणि मराठा समाजाची अग्निपरीक्षा घेत आहे. ज्यांनी सरकारला सत्तेत बसवलं, त्याच मराठा समाजाला उन्हात होरपळायला लावलं जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.
तसेच, “मी मराठा समाजाच्या मुलांच्या भविष्य आणि कल्याणासाठी लढतोय. पण सरकारला दया-माया नाही का? हे सरकार भावनाशून्य आहे का?” असा सवाल करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. आता सरकारचे प्रतिनिधी आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात होणाऱ्या चर्चेतून काही तोडगा निघतो का, की आंदोलन आणखी तीव्र होतं, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Published on: May 29, 2026 11:43 AM
Follow Us