Nagraj Manjule : मराठी भाषा किती दिवस टिकेल? नागराज मंजुळेंनी स्पष्टच सांगितलं…
राज्यात हिंदी सक्तीवरुन वाद सुरु असतानाच मराठी प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. बघा काय म्हटलंय व्हिडीओमध्ये?
महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याअंतर्गत त्रिभाषा सूत्राचं समीकरण पुढे आणत हिंदी ही तिसरी पर्यायी भाषा म्हणून सांगितले आहे. मात्र याला राज्यभरातून विरोध होत आहे. अशातच येत्या पाच जुलै रोजी ठाकरे बंधूंकडून सरकारच्या या निर्णयाविरोधात आणि हिंदी सक्ती विरोधात मोर्चाची घोषणा करण्यात आली आहे. अशातच मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय ज्यात त्यांनी मराठी भाषेवर आपलं मत व्यक्त केल्याचे पाहायला मिळतंय.
‘आपण आपली भाषा रोज बोलायची आणि एखाद्या दिवशी फक्त तिचा अभिमान बाळगायचा, असं असायला नको. तिचा अभिमान रोजच बाळगायला पाहिजे. पुण्यात एका कार्यक्रमात सूत्रसंचालकाने विचारलं की, तुला काय वाटतं मराठी भाषा किती दिवस टिकेल? त्यावेळी मला जरा चिंताही वाटली, हसूही आलं. भाषा किती दिवस टिकेल, असा प्रश्न खूप वर्षांपासून भेडसावतोय. मोठमोठ्या दिग्गजांनी भाषेबद्दलची चिंता व्यक्त केली. भाषा टिकेल की नाही? हा एक प्रश्न असतो. मराठीची पडझड होते, असं वाटतं राहातं.’, असं मंजुळे म्हणाले.
