Mehboob Shaikh : देवाभाऊ… राम खाडे हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण? थेट फडणवीसांना सवाल करत मेहबूब शेख यांचा कुणावर निशाणा?
संविधान दिनादिवशी सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर मेहबूब शेख यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. खाडे यांना मिळालेले पोलीस संरक्षण का काढून घेण्यात आले, त्यांचा शस्त्र परवाना रद्द का केला, आणि या हल्ल्याचा सूत्रधार कोण, याची उत्तरे गृहविभागाकडून मागितली आहेत.
संविधान दिनादिवशी सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मेहबूब शेख यांनी तात्काळ या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. राम खाडे हे देवस्थान जमीन, वक्फ बोर्डाच्या जमिनी आणि वाळू तस्करीसारख्या अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणण्यासाठी ओळखले जातात.
मेहबूब शेख यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल केला की, राम खाडे यांना न्यायालयाने दिलेले पोलीस संरक्षण का काढून घेण्यात आले? तसेच, आष्टी पोलिसांनी कोणाच्या सांगण्यावरून खाडे यांना संरक्षणाची गरज नसल्याचा अहवाल दिला? त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्यामागे गृह विभागाचा काय उद्देश होता, यावरही शेख यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सामाजिक कार्यकर्त्यांवरील अशा हल्ल्यांच्या मास्टरमाइंडला शोधण्याची मागणी त्यांनी केली आहे, अन्यथा आपण शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
