पुणे बलात्काराच्या घटनेवर गृहराज्यमंत्री असंवेदनशील वक्तव्य, ‘मुलीने प्रतिकार, आरडाओरडा केला नाही आणि..’

पुणे बलात्काराच्या घटनेवर गृहराज्यमंत्री असंवेदनशील वक्तव्य, ‘मुलीने प्रतिकार, आरडाओरडा केला नाही आणि..’

| Updated on: Feb 28, 2025 | 10:21 AM

पुण्यात बसमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटेवर भाष्य करताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मुलीने प्रतिकार केला नाही, आरडाओरडा झाला नाही असं वक्तव्य केलं आहे. त्यावरून काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी आरोपीला क्लिनचीट देताय का? असा परखड सवाल केला आहे.

गृहराज्यमंत्री योगेश कदम पुण्यामध्ये येऊन बलात्कार झालेल्या तरुणीवरून त्यांनी एक बेजबाबदार वक्तव्य केलं. रोखणं, हाणामारी, प्रतिकार काहीही घडलेलं नाही. अतिशय शांततेनं ती घटना घडली असं म्हणत तरुणींना आरडाओरडा का केला नाही असा प्रतिसवाल करण्याचा प्रयत्न गृहराज्यमंत्री योगेश कदम करताहेत. दरम्यान, योगेश कदम यांच्या याच वक्तव्यावरून काँग्रेसनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीसोबत महायुतीचं नातं काय? आरोपीला वाचवण्यासाठी पीडित मुलीवर महायुतीमधील मंत्र्यांकडून आरोप का? स्वारगेट अत्याचार प्रकरणामध्ये अजून आरोपी पकडला नाही तरी गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आरोपीला क्लिनचीट देत आहेत का? स्वारगेटमध्ये अत्याचार झाला आणि या मंत्र्यांच्या मते त्या मुलीने विरोध केला नाही म्हणजे या गुन्ह्याची जबाबदारी त्या पीडित मुलीवर ढकलत आहेत. विधान करताना मंत्र्यांनी थोडी तरी लाज शरम बाळगली पाहिजे. आरोपीला शोधण्याऐवजी पीडित मुलीला दोष देऊन सिद्ध काय करायचं आहे? आरोपीला क्लिनचीट देण्यासाठी मंत्र्यांची इतकी घाई का आहे? राज्यातील महिलांना लाडक्या बहिणी म्हणून मिरवणाऱ्या युती सरकारची नियत इतकी खालच्या स्तरावरची असताना महिलांना सुरक्षित कसं वाटेल? असं वडेट्टीवार म्हणाले. एसटी बस डेपोतच बलात्कार होतो सुरक्षा रक्षक तैनात असतात तरीही तरुणीची अब्रू लुटली जाते आणि गृहराज्यमंत्री पुण्यामध्ये येऊन असंवेदनशील वक्तव्य करतात त्यावरून आता विरोधकांनी संताप व्यक्त केलाय.

Published on: Feb 28, 2025 10:20 AM