Thackeray Brothers : काल ‘मातोश्री’वर ड्रोनच्या घिरट्या अन् आज ‘शिवतीर्थ’वर वाढवली सुरक्षा, घडतंय काय?
उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाजवळ ड्रोन आढळल्यानंतर राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर सुरक्षेत किंचित वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी राज ठाकरेंच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला होता, मात्र सुरक्षेत वाढ करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगामी निवडणुका आणि नेत्यांच्या वाढत्या हालचाली यामुळे ही वाढ केली असावी, अशी चर्चा आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाजवळ ड्रोन आढळल्याच्या प्रकरणानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी पोलीस विभागामार्फत राज ठाकरे यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला होता आणि त्यानंतर शनिवारपासून त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्तात किंचित वाढ करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज ठाकरे यांना यापूर्वीच Y+ दर्जाची सुरक्षा होती. सुरक्षेत वाढ करण्यामागचे नेमके कारण अद्याप पोलिसांनी स्पष्ट केलेले नाही. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि नेत्यांच्या वाढलेल्या राजकीय हालचाली यामुळे ही सुरक्षा वाढवण्यात आल्याची चर्चा आहे. मातोश्रीबाहेर ड्रोन उडविल्याबद्दल एमएमआरडीएने स्पष्टीकरण दिले असले तरी, या घटनेनंतर राज ठाकरेंच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आणि त्यानंतर ही वाढ करण्यात आली.
