मुंबईसह उपनगरात पावसाची बॅटिंग; सखल भागांत पाणी साचायला सुरुवात
मुंबई आणि उपनगरांप्रमाणेच ठाण्यातही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
मुंबईत आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली असून, हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सध्या पश्चिम द्रुतगती मार्गावर पाऊस आणि जोरदार वारा अनुभवायला मिळत आहे. शुक्रवार असल्याने चाकरमानी पावसातून वाट काढत कामावर निघाले आहेत. अनेकांनी छत्री आणि रेनकोटचा आधार घेत प्रवास सुरू केला आहे. वांद्रे स्थानकावर सध्या सर्व लोकल गाड्या वेळापत्रकानुसार सुरळीत चालू असल्या, तरी पावसाचा जोर वाढल्यास रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मुंबई आणि उपनगरांप्रमाणेच ठाण्यातही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील तीन तास मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सततच्या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी भरू लागले आहे.
मुंबईत सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या ऑरेंज अलर्टनुसार, ठिकठिकाणी मुसळधार पावसाची नोंद होत आहे. विलेपार्ले परिसरात पावसामुळे वाहतूक खोळंबली आहे. विलेपार्ले ब्रिजखाली पाणी साचले असून, पुलावरून वाहणारे पाणी थेट सर्व्हिस रोडवर जमा झाले आहे, ज्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, पाणी उपसण्यासाठी पंपिंग मशीनचा वापर सुरू आहे. प्रशासनाकडून पाणी काढण्याचे तातडीने प्रयत्न सुरू असले, तरी सध्या वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे.
