Mumbai BMC Polls : सायनमध्ये AB फॉर्मचा झोल अन् भाजप उमेदवारच नॉट रिचेबल
सायन येथील 173 क्रमांकाच्या वॉर्डात भाजपने एबी फॉर्मची रंगीत झेरॉक्स वापरून उमेदवारी अर्ज भरल्याचा प्रकार समोर आला आहे. युतीत शिंदे सेनेला जागा सुटलेली असतानाही, भाजपनेते दत्ता केळुस्कर यांनी पत्नीचा परस्पर अर्ज भरत स्वतःला नॉट रिचेबल केले. निवडणूक आयोगाने हा बनावट अर्ज ग्राह्य धरल्याने ठाकरे गटाने आक्षेप घेतला असून, महायुतीमध्ये यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे.
मुंबईतील सायन प्रतिक्षा नगरमधील 173 क्रमांकाच्या वॉर्डात एक अभूतपूर्व राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. भाजपने एबी फॉर्मची रंगीत झेरॉक्स वापरून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचा प्रकार समोर आला असून, संबंधित भाजप नेते दत्ता केळुस्कर अर्ज भरल्यानंतर नॉट रिचेबल झाले आहेत. यामुळे भाजपसह महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. जागावाटपानुसार हा वॉर्ड शिंदे सेनेच्या उमेदवारासाठी सुटला होता आणि येथून ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कांबळे शिंदे सेनेकडून निवडणूक लढवत आहेत. मात्र, भाजपने आधी शिल्पा केळुस्कर यांना एबी फॉर्म दिला होता.
जागावाटप निश्चित झाल्यावर भाजपने त्यांना मूळ फॉर्म परत करण्याची सूचना केली. दत्ता केळुस्कर यांनी मूळ फॉर्म परत केला, परंतु त्याआधी त्यांनी त्याची रंगीत झेरॉक्स काढून ठेवली होती. हीच झेरॉक्स त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केली आणि आयोगाने तो अर्ज ग्राह्य धरला. या प्रकारामुळे ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रंगीत झेरॉक्स अर्ज कसा स्वीकारला गेला, यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. महायुतीमध्ये एकीकडे ठरलेला उमेदवार असताना, दुसऱ्या उमेदवाराचा अर्ज स्वीकारल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.