राजू शेट्टींकडून जैन बोर्डिंग ट्रस्ट व्यवहारात मोहोळांवर गंभीर आरोप!
मुरलीधर मोहोळ यांच्या स्पष्टीकरणानंतर राजू शेट्टी यांनी जैन बोर्डिंग व्यवहारात त्यांचा सहभाग असल्याचा दावा केला आहे. मोहोळ यांनी राजीनामा दिल्यानंतरही ट्रस्टींशी संपर्क साधल्याचे आणि जैन बोर्डिंगला भेट दिल्याचे छायाचित्रे उपलब्ध असल्याचे शेट्टी म्हणाले. तसेच, गोखले बिल्डर्सला ५० कोटींचे कर्ज तातडीने मंजूर होण्यामागे मोहोळांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंग प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी त्यांच्या दाव्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मोहोळ यांनी केलेले आरोप निराधार असल्याचे म्हटले असले तरी, शेट्टी यांनी या प्रकरणातील काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
राजू शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार, मोहोळ यांनी एलएलपींच्या राजीनाम्यानंतरही जैन बोर्डिंग ट्रस्टींशी संपर्क साधला होता आणि परिसराला भेट दिली होती, याचे छायाचित्रे उपलब्ध आहेत. तसेच, कर्नाटकातील चिकोडी येथील वीरेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने गोखले बिल्डर्सला अर्ज केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ५० कोटी रुपयांचे कर्ज कसे मंजूर केले, यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या सोसायटीचे चेअरमन अण्णासाहेब जल्ले हे भाजपचे माजी खासदार असल्याने, या व्यवहारात मोहोळांचा केंद्रीय सहकारमंत्री म्हणून सहभाग नाकारता येणार नाही, असे शेट्टी म्हणाले. त्यांनी मोहोळांना या चुकीच्या व्यवहारात लक्ष घालून तो थांबवण्याची मागणी केली.
