Nagpur : दिल्लीच्या सोनसाखळी चोरट्यांच्या टोळीला नागपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Nagpur Crime News : नागपूर पोलिसांनी दिल्लीतील एका सोनसाखळी चोरट्यांच्या टोळीला अटक करून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
नागपूर पोलिसांनी दिल्लीतील एका सोनसाखळी चोरट्यांच्या टोळीला अटक करून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींना ट्रान्झिट रिमांडवर नागपुरात आणण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना 17 जुलै 2025 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या टोळीतील दोन साथीदार अजूनही फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची मोहीम सुरू आहे.
मूळचे दिल्लीचे असलेले हे आरोपी यापूर्वी दिल्लीत अनेक गुन्ह्यांमध्ये सामील होते. त्यांचा एक साथीदार वर्धा जिल्ह्यातील आहे, जो दिल्लीत शिक्षणासाठी गेला असताना या टोळीच्या संपर्कात आला आणि नंतर त्यांच्यासोबत चोरीच्या कृत्यात सहभागी झाला. या साथीदाराच्या मदतीने टोळीने नागपूर शहराला लक्ष्य केले. धंतोली, सीताबर्डी, अजनी, सदर आणि ग्रामीण भागात त्यांनी धुमाकूळ घालत सुमारे साडेसात तोळ्यांच्या सोनसाखळ्या चोरल्या. या साखळ्या सराफा व्यापाऱ्यांना विकून मिळालेले पैसे त्यांनी मौजमस्ती, नवीन कपडे आणि मनसोक्त भोजनासाठी खर्च केले.
