Sunita Williams Return Video : ते नऊ महिने… माणसाच्या जगापासून दूर… असा होता सुनीता विल्यम्सचा थक्क करणारा ‘ग्रह’ वापसीचा प्रवास
नऊ दिवसांसाठी अंतराळात गेलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी २८६ दिवस स्पेस स्टेशनमध्ये वास्तव्य केलं. २८६ दिवसांच्या कालावधीत त्यांनी अंतराळात ९०० तास वेगवेगळ्या विषयांवर संशोधन केलं. अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी महिला म्हणून सुनीता विल्यम्स यांच्या नावावर नवा विक्रम नोंदवला गेला.
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अवघ्या आठ दिवसांसाठी अंतराळामध्ये गेलेल्या मात्र तब्बल नऊ महिन्यांपासून अंतराळामध्ये अडकून पडलेल्या अखेर पृथ्वीवर परतल्या. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांना घेऊन नासा आणि स्पेस एक्सचा कॅप्सूल भारतीय वेळेनुसार पहाटे तीन वाजून २७ मिनिटांनी पृथ्वीवर दाखल झालं. फ्लोरिडाच्या समुद्रामध्ये हे कॅप्सूल उतरलेलं आणि सुनीता विल्यम्स यांना बाहेर काढण्यात आलं. अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी ५ जून २०२४ ला स्टारलाइनर यानातून अंतराळात झेप घेतली होती. ८ दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात राहून ते दोघेही पृथ्वीवर परतणार होते. त्यावेळी अंतराळ यानात बिघाड झाल्यामुळे हे दोघेही अंतराळ स्थानकातच अडकून पडले. स्टारलाइनर अंतराळ यानाला प्रक्षेपण झाल्यापासून अनेक समस्या होत्या. स्टारलाइनर अंतराळ यानाच्या सर्व्हिस मॉड्यूलमध्ये हेलियम वायूच्या गळतीमुळे समस्या निर्माण झाली. अंतराळात उपस्थित असलेले क्रू आणि ह्युस्टनमध्ये बसलेले मिशन मॅनेजर बिघाड दुरुस्त करू शकले नाहीत.
बिघाड आणि समस्यांमुळे सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर यांचा नऊ महिन्यांचा अंतराळ प्रवास तब्बल २८६ दिवसांपर्यंत लांबला. अखेर ९ महिन्यानंतर ड्रॅगन या स्पेस एक्सच्या यानांमधून त्यांना पृथ्वीवर परत आणण्याची मोहीम आखण्यात आली. काल भारतीय प्रमाण वेळेनुसार दहा वाजून ३५ मिनिटांनी यानाचा परतीचा प्रवास सुरू झाला. अंतराळवीरांचा स्पेस स्टेशन ते पृथ्वी पर्यंतचा प्रवास हा सुमारे १७ तासांचा होता. आज मध्यरात्री २ वाजून ४१ मिनिटांनी यानाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. भारतीय प्रमाण वेळेनुसार मधरात्री ३ वाजून २७ मिनिटांनी यान फ्लोरिडाच्या समुद्रात यशस्वी उतरलं. त्यानंतर अर्ध्या तासानं रिकव्हरी टीमने सर्व अंतराळवीरांना यशस्वीपणे बाहेर काढलं. परतलेले अंतराळवीर सुखरूप असल्याची नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामचे मॅनेजर स्टीव्ह स्टिच यांनी माहिती दिली आहे.
