Raj Thackeray : इतका चुकीचा कॅरम फुटलाय की कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भो$@…, राज ठाकरे नाशकात गरजले
राज ठाकरे यांनी नाशिक येथील सभेत महाराष्ट्रातील रखडलेल्या महानगरपालिका निवडणुकांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. चार वर्षांहून अधिक काळ निवडणुका न झाल्याने त्यांनी सरकारला जबाबदार धरले. सध्याच्या राजकीय गोंधळाचे वर्णन कॅरम फुटल्यासारखे असे करत, त्यांनी उमेदवारी अर्ज गिळण्याच्या आणि बिनविरोध निवडींच्या घटनांवरून लोकशाही मूल्यांच्या घसरणीवर प्रकाश टाकला.
राज ठाकरे यांनी नाशिक येथे आयोजित सभेत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तीव्र शब्दांत भाष्य केले. व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. ठाकरे यांनी महानगरपालिका निवडणुका चार वर्षांहून अधिक काळ का रखडल्या, असा सवाल सरकारला केला. या दिरंगाईचे कारण सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.
महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय गोंधळाचे वर्णन करताना राज ठाकरे म्हणाले, इतका चुकीचा कॅरम फुटलायं की कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात आहेत तेच कळत नाही. निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांवरही त्यांनी बोट ठेवले. एका घटनेचा उल्लेख करत ते म्हणाले की, उमेदवारी अर्ज छाननीच्या वेळी एकाने प्रतिस्पर्ध्याचा एबी फॉर्म गिळून टाकला.
तसेच, सत्ताधारी पक्षाचे 60-70 उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. हे मतदारांच्या मतदानाच्या अधिकारावर गदा आणण्यासारखे आहे, असे ठाकरे यांनी नमूद केले. या सर्व घटना महाराष्ट्राच्या लोकशाही व्यवस्थेतील सद्यस्थिती दर्शवतात.
