Manikrao Kokate : अखेर राजीनामा, माणिकराव कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
माणिकराव कोकाटेंनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर, मुख्यमंत्री फडणवीसांनी तो स्वीकारला. त्यांच्या अटकेसाठी नाशिक पोलीस रात्री दीड वाजेपर्यंत लीलावती रुग्णालयात होते. न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच राजीनामा मंजूर झाला. नव्या मंत्र्याची नेमणूक जिल्हा परिषद निवडणुकांनंतरच होईल, तोपर्यंत कोकाटेंचं खातं अजित पवारांकडेच राहणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो स्वीकारला आहे. हा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटेंच्या जागी नव्या मंत्र्याची नेमणूक जिल्हा परिषद निवडणुका संपल्यानंतरच केली जाईल. तोपर्यंत कोकाटेंचा कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राहणार आहे.
कोकाटेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस रात्री मुंबईतील लीलावती रुग्णालयात पोहोचले होते. जवळपास तीन तास हे पथक रुग्णालयात होते आणि त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांचा जबाब नोंदवला. कोकाटेंवर अँजिओग्राफी होणार असून, त्याचा अहवाल आल्यानंतर अटकेबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आहे. दरम्यान, कोकाटेंनी शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, आज या प्रकरणी सुनावणी अपेक्षित आहे. अजित पवारांनी ट्वीट करून न्यायालयाचा निकाल आणि कायद्याचे सर्वोच्च स्थान मान्य करत राजीनामा स्वीकारल्याचे म्हटले आहे. नवीन मंत्रीपदासाठी जातीय समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न केला जाईल, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
