Manikrao Kokate : ना राजीनामा…ना खात्यात बदल… कोकाटेंची माफी दादांना मान्य; म्हणाले, यापुढे मी…
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांवर अजित पवार नेमका काय फैसला घेतात याकडे नजरा लागलेल्या होत्या पण अखेर कोकाटे यांच्या दिलगीरीवर अजित पवार यांचं समाधान झाल्याचं दिसतंय. कारण कोकाटे यांना अभय देण्यात आलंय. त्यानंतर आता विरोधकांनी महाराष्ट्रभर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अखेर मंत्री माणिकराव कोकाटेंना अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांनी अभय दिलाय. रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यावरही कोकाटे यांची मंत्री पदावरून हकालपट्टी टळली आहे. म्हणजे कोकाटे मंत्रीही राहणार आणि कृषी खातंही सांभाळणार आहेत. कारण खातं बदलणार अशी चर्चा होती त्या कारवाई पासूनही कोकाटेंना एक प्रकारे माफी मिळाली आहे. मंत्रालयात अजित पवार आणि कोकाटे यांची बैठक झाली. ज्यामध्ये अजित पवार यांनी कोकाटेंवर नाराजी व्यक्त केली.
तुमच्यामुळे सरकारची बदनामी होते आहे बोलताना आपण भान ठेवायला हवं. मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे आम्ही तुम्हाला खूप सांभाळलं अशा शब्दात अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले यावर कोकाटेंनी अजित पवार यांसमोर दिलगीरी व्यक्त करत यापुढे सांभाळून बोलेन अशी चूक पुन्हा करणार नाही, असं म्हटलंय. अजित पवार आणि कोकाटे यांच्यामध्ये वीस मिनिट चर्चा झाली. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी अजित पवारसोबत इतर मंत्र्यांची देखील बैठक झाली. ज्यात ज्येष्ठ मंत्र्यांनी कोकाटेवर कारवाई नको तर समज देऊया कोकाटे यांच काम चांगले आहे, असं म्हणत राजीनामा न घेण्याची विनंती केली. मंत्रालयात अजित पवार सोबतची बैठक झाल्यानंतर पत्रकारांनी कोकाटेना विचारणा केली मात्र कोकाटे काहीही न बोलता मंत्रिमंडळाच्या बैठकीला निघाले. तिथेच हे स्पष्ट झाले होते की कोकाटेंचा राजीनामा नाही.
