Manikrao Kokate : 42 सेकंद नाही तर ‘इतके’ मिनिटं कोकाटेंचा रमीचा डाव, विधीमंडळ चौकशी अहवाल समोर, पवारांनी पुन्हा सरकारला घेरलं
सभागृहात तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळणाऱ्या कृषिमंत्र्यावर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्वर्गीय अटलजींच्या तर उपमुख्यमंत्री अजितदादांना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? असा सवालही रोहित पवारांनी केलाय.
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मागची साडेसाती काही केल्या कमी होताना दिसत नाही. नुकतीच मंत्रालयात अजित पवार आणि कोकाटे यांची बैठक झाली. ज्यामध्ये अजित पवार यांनी कोकाटेंवर नाराजी व्यक्त केली. यानंतर कोकाटेंनी यापुढे सांभाळून बोलेन अशी चूक पुन्हा करणार नाही, असं वचन देत झालेल्या चुकांबद्दल दिलगिरी व्यक्त केली. यानंतर झालेल्या बैठकीत कोकाटेंना अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांनी अभय दिला असल्याचे पाहायला मिळाले. असे असताना विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी होतानाच दिसतेय. अशातच आज रोहित पवारांनी एक ट्वीट करत कोकाटेंबाबतचा विधीमंडळ चौकशीचा अहवाल आला असल्याचे म्हणत १८ ते २२ मिनिटं सभागृहात कोकाटेंचा रमीचा डाव रंगल्याचा दावा केलाय.
कृषिमंत्री सभागृहात केवळ ४२ सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल असून हा अहवाल मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे. सरकार याबाबत खुलासा करेल का? असा सवाल रोहित पवारांनी केलाय.
