Rohit Pawar : मोठी बातमी, रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल, प्रकरण नेमकं काय?
रोहित पवार आणि पोलिसांचा एक व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता, ज्यामध्ये रोहित पवार पोलीस अधिकाऱ्याला "आवाज खाली करा", "हातवारे करू नका" असे बोलताना दिसले होते. याप्रकरणी रोहित पवारांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. आमदार रोहित पवार यांच्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी रोहित पवार यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना अटक झाल्यानंतर रोहित पवारांचा पारा चढल्याचे पाहायला मिळाले होते. मरीन ड्राईन पोलीस ठाण्यात झालेल्या वादाचा व्हिडीओ व्हायरलही झाला होता. यामध्ये रोहित पवार हे पोलिसांना हातवारे करून बोलू नका, आवाज खाली करा, असं म्हणत पोलिसांवरच भडकले होते.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली होती. यानंतर जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी अटक केली. या अटकेनंतर, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे दोघे आमदार मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात देशमुख यांच्या अटकेची चौकशी करण्यासाठी पोहोचले होते. तिथे रोहित पवार यांची एका पोलीस अधिकाऱ्याशी बाचाबाची झाली.
