Chhagan Bhubal : छगन भुजबळांनी भर सभेत केला वडेट्टीवारांचा भांडाफोड, थेट लावला ‘तो’ व्हिडीओ
ओबीसी एल्गार मेळाव्यात छगन भुजबळ यांनी विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर वडेट्टीवार यांची डबल ढोलकी भूमिका भुजबळांनी एका व्हिडिओद्वारे उघड केली. ओबीसींच्या विविध रॅलींमध्ये गैरहजेरीबद्दलही त्यांनी वडेट्टीवारांवर टीका केली.
बीड येथील ओबीसी एल्गार मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत वडेट्टीवार यांच्यात असलेला विरोधाभास भुजबळांनी एका व्हिडिओद्वारे उपस्थित जनसमुदायासमोर मांडला. वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देत असताना, ओबीसींच्या विविध मेळाव्यांमध्ये गैरहजेरी लावल्याचा आरोप भुजबळांनी केला.
यावेळी भुजबळ यांनी आठवण करून दिली की, वडेट्टीवार यांनी सुरुवातीला अंबड येथील ओबीसी मेळाव्यात पिवळा झेंडा घेऊन लढण्याचे आवाहन केले होते. मात्र, हिंगोली, नगर, पंढरपूर आणि बीड येथील पुढील ओबीसी रॅलींमध्ये वडेट्टीवार अनुपस्थित राहिले. “तुम्ही ओबीसींच्या सोबत राहण्याचे वचन देऊनही का आला नाहीत?” असा सवाल भुजबळांनी केला.
मराठा आरक्षणासाठी कुणबी नोंदींच्या पुराव्यांची मागणी असतानाही, मागील चार महिन्यांत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकांमध्ये कोणताही ठोस निर्णय किंवा मसुदा तयार न झाल्याचे भुजबळांनी निदर्शनास आणले. तासातासाला भूमिका बदलल्यास ओबीसी समाजाचा घात होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
