Pankaja Munde : तुम्ही वाटोळं केलं पोरांनो, शरम नाही… कोणाची सुपारी… भर कार्यक्रमात पंकजाताई संतापल्या, बघा काय घडलं?
पंकजा मुंडे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या बेशिस्त वर्तनावर तीव्र संताप व्यक्त केला. "तुम्हाला शरम नाही?" असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना फटकारले. दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या नजरेतील शरम तुमच्यात दिसत नाही, असे त्या म्हणाल्या.
राजकीय कार्यक्रमांमध्ये कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या बेशिस्त वर्तनामुळे नेत्यांना अनेकदा नाराजी व्यक्त करावी लागते. अशाच एका प्रसंगात, पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरील दसरा मेळाव्यात आलेल्या काही लोकांवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. व्हिडीओमध्ये पंकजा मुंडे अत्यंत संतप्त अवस्थेत दिसत आहेत. त्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाल्या, “तुम्ही वाटोळं केलं पोरांनो. कोणाची सुपारी घेऊन आलात मला माहीत नाही. तुम्हाला शरम नाही, तुम्हाला शरम नाही.” दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या परंपरेचा संदर्भ देत त्यांनी कार्यकर्त्यांच्या वर्तनावर खेद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “जी शरम गोपीनाथ मुंडेंच्या नजरेत होती ना, ती तुमच्यात दिसत नाही आम्हांला.” पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना भगवान गडावरील वर्षानोवर्ष दसरा मेळाव्याचाही उल्लेख केला.
“जो माझा दसरा भगवान गडाचा होता, तोसुद्धा माझ्याहून हिरावून घेतला. आता तुम्ही पण हा हिरावून घेण्यासाठी आलाय असं वाटायला लागलं.” असे त्या म्हणाल्या. इतकी वर्षे भाषणे केली तरी असे बेशिस्त वर्तन कधी पाहिले नाही, असेही पंकजा मुंडे स्पष्ट केले. बेशिस्त लोकांना आपण सांभाळत नाही, असा कठोर इशाराही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
