MNS : मला साथ दिली नाही, वरिष्ठांनी तुच्छ समजलं, मनसेत आता दिवाळी पण माझ्या घरी अंधार; महाजनांची उघड नाराजी
दोन भावांची युती व्हावी ही जनभावना बोलून दाखवणे गुन्हा आहे का? असा सवाल करत मनसेच्या प्रकाश महाजनांची नाराजी बाहेर पडली आहे. मनसेच्या पक्ष शिबिरामध्ये त्यांना आमंत्रणही देण्यात आलं नाही. त्यामुळे भावनिक होत त्यांनी पक्षाच्या कारभारावरच बोट ठेवलं आहे.
नारायण राणे प्रकरणात मला साथ दिली नाही, असं म्हणत मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. मनसेत आता दिवाळी सुरू आहे पण माझ्या घरी आंधार आहे. तर प्रवक्त्यांना तुम्ही इतकं तुच्छ समजता का? असा सवाल प्रकाश महाजनांनी केलाय. माझी भक्ती खरी असेल तर माझा पांडुरंग मला बोलवेल असंही प्रकाश महाजन म्हणाले.
‘नारायण राणे यांच्या प्रकरणात पक्षाने मला साथ दिली नाही. हे दुःख विसरलो मी. पक्षातच इज्जत नसेल तर करायचं तरी काय? प्रवक्ते एक तुच्छ पद आहे आमच्या पक्षात. इतकं तुच्छ पद आहे. जर आम्हाला तुम्हीच किंमत नाही देणार तर बाकीचे काय किंमत देतील? म्हणजे मला मला सोडा माझ्या घरच्या समोर मी काय तोंड दाखवू?’, असं म्हणत प्रकाश महाजन यांनी खंत व्यक्त केली आहे. दोन्ही ठाकरे एकत्र यावेत ही जनभावना बोललो तर काय वाईट केलं? दोन भाऊ एकत्र यावेत माझा काय फायदा होणार होता? जनभावना होती मी जनतेत पाहतो फिरतो. ह्यात मी काय वाईट असं केलं? असंही म्हणत असताना महाजन भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
