गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर….; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
पुण्यातील आयुष कोमकर प्रकरणात, बंडू आंदेकरला उमेदवारी मिळाल्यास आयुषच्या आईने आत्मदहनाचा गंभीर इशारा दिला आहे. मुलाच्या मृत्यूनंतर आपली सर्व नाती संपल्याचे सांगत, आंदेकरला तिकीट दिल्यास पक्ष कार्यालयाबाहेर हे टोकाचे पाऊल उचलण्याची त्यांनी घोषणा केली. मुलाच्या निधनानंतर जगण्याची इच्छा नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पुणे येथील आयुष कोमकर प्रकरणात एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. आयुष कोमकरच्या आईने बंडू आंदेकरला कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी दिल्यास आत्मदहन करण्याचा गंभीर इशारा दिला आहे. आयुष कोमकरच्या आईने तीव्र शब्दांत आपली भावना व्यक्त करताना सांगितले की, “आंदेकरने माझ्या मुलाला विकासासाठी मारलं का?”
मुलाच्या मृत्यूसाठी आंदेकर जबाबदार असल्याचा अप्रत्यक्ष आरोप करत, आयुषच्या आईने म्हटले आहे की, “मुलाला मारलं तेव्हाच माझी सगळी नाती संपली. मला आता त्यांच्याविषयी काहीच वाटत नाही.” आंदेकरने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या भूमिकेवर ठाम राहून त्यांनी स्पष्ट केले की, “जर का त्यांना (बंडू आंदेकरला) तिकीट दिलं, तर मी त्यांच्या पक्ष कार्यालयाबाहेर आत्मदहन करेन आणि मी हे खरंच करणार आहे.”
आपल्या मुलाच्या निधनानंतर आलेल्या निराशेपोटी, त्यांना जगण्याची इच्छा उरली नसल्याचेही त्यांनी नमूद केले. “कारण का जिथं माझा मुलगा गेला, तिथं मला पण जगण्याची इच्छा नाहीये,” असे म्हणत त्यांनी आपल्या वेदनांना वाट मोकळी करून दिली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि महाराष्ट्र राजकारणाच्या पार्श्वभूमीवर या इशामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
