Pune : खाकीला डाग! पुणे पोलीस दलात खळबळ, पोलिसानेच लाटले 73 तोळे सोने अन् महिलेची…
"मी पोलीस खात्यात नोकरीला असल्यामुळे माझ्या नावाने बँकेतून कर्ज काढता येत नाही. माझ्याकडे ५ किलो सोने आहे. परंतू ते दुकानात मी गहाण ठेवलेले आहे. माझे मार्केटमध्ये १ कोटी रूपये आहेत. माझ्या नावावरील जमीन विक्रीचा व्यवहार लवकरच होणार आहे. त्यातुन येणाऱ्या रक्कमेतून तुमच्याकडून घेतलेली रक्कम व सोने परत करेन" अशी बतावणी जगताप यांनी केली.
पुण्यात खाकीलाच डाग लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलीस दलातील निलंबित पोलिसानेच तब्बल ७३ तोळे सोने लाटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाहीतर या निलंबित पोलीस कर्मचाऱ्याने ७३ तोळे सोन्यासह १७ लाख रुपये घेऊन महिलेची फसवणूक केल्याचे उघड झाल्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या या प्रतापामुळे पुणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या पुणे पोलीस दलातील निलंबित पोलीस अधिकाऱ्याने ओळखीचा फायदा घेत खोटं सांगून महिलेची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. इतकंच नाहीतर राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी २०२१ मध्ये खोटे कागदपत्र देखील त्याने तयार केल्याची माहिती मिळतेय. या निलंबित पोलीस अधिकाऱ्याचं नाव गणेश अशोक जगताप असे असून ५१ वर्षीय महिलेने याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. चतुशृंगी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
