Pigeon borne Disease : अन् ती आम्हाला सोडून गेली; फुप्फुसांना डाग, ७ वर्ष खोकल्यानं त्रस्त, कबुतरांमुळं पुण्यात महिलेचा मृत्यू
दादरच्या कबुतरखाण्याचा वास सुरू असताना कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांचा मुद्दा चर्चेला जाऊ लागलाय. कबुतरांमुळे झालेल्या श्वसनाच्या आजारामुळे पुण्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय.
कबुतरांना दाणे टाकणं, त्यांचा घराजवळचा वावर आणि कबुतरांची विष्ठा किती जीवघेणं ठरू शकतं, याचं एक उदाहरण समोर आलंय. पुण्यात राहणाऱ्या ४३ वर्षीय शीतल शिंदे यांचा जानेवारी महिन्यात मृत्यू झाला. शीतल शिंदेना सात वर्षांपूर्वी श्वसनाचा आजार झाला. डॉक्टरांकडे तपासणी केल्यानंतर फुप्फुसांना इजा झाल्याचं निदान झालं. पुण्यातील जवळपास सर्वच नामांकित रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र फुप्फुसांना पडलेले डाग वाढतच गेले. तब्बल ७ वर्ष शीतल शिंदे खोकल्यामुळे त्रस्त होत्या. शीतल यांना रात्रभर खोकल्याची उबळ यायची. बाहेर जाताना ऑक्सिजन सिलेंडर सोबतच बाळगावा लागायचा. शीतल यांनी या आजारावरची सर्व औषधं घेतली. डॉक्टरांनी सांगितलेल्या आहाराचं तंतोतंत पालनही केलं. पण शेवटी नैसर्गिक श्वास घेता न आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
सिटाकोसिस आणि हिस्टोप्लास्मोसिस अशी कबुतरामुळे होणाऱ्या आजारांची नावं आहेत. कबुतरांच्या विष्ठेत एक विशिष्ट प्रकारची बुरशी असते. उन्हामुळे ही विष्ठा कडक होते. त्यानंतर त्याच पाऊडरमध्ये रूपांतर होतं आणि हवेतून श्वासावाटे ही पाऊडर आपल्या फुप्फुसांमध्ये जाते. त्यानंतर फुप्फुस कमकुवत किंवा निकामी व्हायला सुरुवात होते. दरम्यान, भाजपचे आमदार चित्रा वाघ यांनी देखील विधान परिषदेत कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांचा मुद्दा उपस्थित केला. चित्रा वाघ यांच्या मामींचाही कबुतरांमुळे होणाऱ्या आजारामुळेच मृत्यू झाला होता.
