Raj Thackeray : आधी मतदार याद्या साफ करा, मग पारदर्शी निवडणुका घ्या – राज ठाकरेंची मागणी
सत्याचा मोर्चात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आधी मतदार याद्या साफ करा, मग पारदर्शक निवडणुका घ्या अशी मागणी केली. पारदर्शक निवडणुकांसाठी मतदार याद्यांचे शुद्धीकरण आवश्यक आहे असेही त्यांनी नमूद केलं.
मुंबईत काढण्यात आलेल्या सत्याचा मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार याद्यांच्या शुद्धीकरणावर जोरदार भर दिला आहे. आधी मतदार याद्या साफ करा, मग पारदर्शक निवडणुका घ्या, अशी स्पष्ट आणि आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. हा मोर्चा केवळ कार्यकर्त्यांचा राग व्यक्त करण्यासाठी किंवा पक्षाची ताकद दाखवण्यासाठी नव्हता, तर मतदार याद्यांमधील गंभीर अनियमितता आणि दुबार मतदारांच्या समस्येकडे दिल्लीतील संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित करण्यात आला होता, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मतदार याद्यांमधील गोंधळ आणि दुबार मतदारांचा मुद्दा हा काही आजचा नाही. या विषयावर मी स्वतः अनेकदा भाष्य केले आहे,असे ते म्हणाले. विशेष म्हणजे, हा मुद्दा केवळ मनसेपुरता मर्यादित नसून, महाराष्ट्रातील इतर प्रमुख राजकीय नेत्यांनी आणि पक्षांनीही या समस्येवर वारंवार चिंता व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांनी यावेळी उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पार्टी, काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) आणि अजित पवार यांच्या गटातील नेत्यांनीही मतदार याद्यांमध्ये दुबार मतदार असल्याचे मान्य केल्याचे सांगितले. जर सर्वच प्रमुख राजकीय पक्ष या समस्येवर सहमत असतील, तर निवडणूक प्रक्रिया पुढे नेण्याची एवढी घाई का केली जात आहे, असा सवाल राज यांनी उपस्थित केला.
