Raj Thackeray : कोणताही झेंडा नाही, मराठी हा अजेंडा; मोर्चाला कोण येत नाही तेच पाहतो!
Raj Thackeray LIVE : हिंदी सक्तीच्या विषयावर ठाकरे बंधु आक्रमक झालेले असून उद्धव ठाकरेंनंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील याविषयावर पत्रकार परिषद घेतली आहे.
कोणताही झेंडा नसेल मराठी हा अजेंडा असेल. या अजेंड्यासाठी मराठी माणसांनी सहभागी व्हावं. सरकारला दाखवावं, राजकीय पक्षां व्यतिरिक्त कोण कोण सामील होतात हे पाहायचं आहे. कोण येणार नाही हेही मला पाहायचं आहे, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हंटलं आहे. आज हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी देखील भूमिका स्पष्ट करत एल्गार पुकारला आहे.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ६ तारखेला सकाळी १० वाजता गिरगाव चौपाटीवरून मोर्चा निघेल. महाराष्ट्रातील मराठीपण घालवण्यासाठी जो कट आखला आहे. तो उद्ध्वस्त करण्यासाठी तमाम मराठी बांधवांनी भगिनींनी सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावं ही विनंती आहे. नुसतंच तोंडदेखले बाकीचे बोलत असतात. ही महत्त्वाची लढाई आहे. या लढाईत संपूर्ण महाराष्ट्राने उतरावं. कोणत्याही वादा पेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, असं सांगत उद्धव ठाकरेंच्या माणसांशी आमची माणसं या मोर्चात सहभागी होण्याबद्दल बोलतील असंही राज ठाकरेंनी यावेळी म्हंटलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना एकत्र येण्याच्या विषयावर साद घातली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
