Saamana : पुणे तिथे गुन्हेच गुन्हे… ‘तो’ हल्ला सुसंस्कृत पुण्याची इभ्रत घालवणारा, ‘सामना’तून टीकास्त्र
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुण्यात सात नवीन पोलीस ठाणी सुरू होत आहेत. मात्र राज्यकर्त्यांच्या आदेशानुसार पोलीस गुन्हेगारांच्याच पाठीशी उभे राहत असतील तर नवीन कितीही पोलीस ठाणी सुरू झाली तर त्याचा काय उपयोग? असा सवालही सामनातून कऱण्यात आला आहे.
अलीकडच्या काळात पुण्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली असल्याचे सामना या वृत्तपत्रातील अग्रलेखातून म्हणण्यात आलंय. इतकंच नाहीतर ‘पुणे तिथे काय उणे ?’ असे पूर्वी पुणेकर अभिमानाने म्हणायचे. पण आता ‘पुणे तिथे गुन्हेच गुन्हे,’ असे म्हणण्याची वेळ पुणेकरांवर आली असल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी पुण्यातील तळजाई मैदानावर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना मारहाण करण्यात आली होती. यावर सामनातून टीका करण्यात आली आहे.
‘तळजाई टेकडीवर पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या मुला-मुलींवर गुंड टोळक्याने केलेला हल्ला हा सुसंस्कृत म्हटल्या जाणाऱ्या पुण्याची इभ्रत घालवणारा आहे. ‘देवाभाऊं’चे गृहखाते पुण्यातील ही ‘भाईगिरी’ संपवणार आहे काय?, असा सवालही थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना करण्यात आलाय.
Published on: Jul 17, 2025 08:21 AM
