बेजबाबदार वक्तव्य करून..; सदाभाऊ खोतांचा गुलाबराव पाटलांना घरचा आहेर
आमदार सदाभाऊ खोत यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील उपकंत्राटदार हर्षल पाटील यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर त्यांना कंत्राटदार नसल्याचे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर आमदार सदाभाऊ खोत यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका करताना कंत्राट पद्धतीत बदल करण्याची मागणी केली आहे.
सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, हर्षल पाटील हा उपकंत्राटदार होता आणि मुख्य कंत्राटदाराकडून कामे घेऊन तो काम करत होता. मात्र, अनेक ठिकाणी काम पूर्ण करूनही त्याला पैसे मिळाले नाहीत. “मंत्री म्हणून काम करताना मंत्रालयातील बारकावे माहीत असणे आवश्यक आहे. बेजबाबदार वक्तव्य करून नवतरुणांना निराश करणे चुकीचे आहे. त्यामुळे गुलाबराव पाटील यांनी तातडीने राजीनामा द्यावा,” अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
