Malegaon Bomb Blast : आमच्या पक्षकारांचे 17 वर्षे वाया गेली, त्याबाबत.. ; आरोपींचे वकील काय म्हणाले?
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांसह सर्व सात आरोपींना पुराव्याच्या अभावामुळे निर्दोष मुक्त केले आहे. १७ वर्षांनंतर आलेल्या या निर्णयाने देशभरात खळबळ उडाली आहे. न्यायालयाने मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे. आरोपींच्या वकिलांनी दावा केला की, चार्जशीटमध्ये पुरेसे ठोस पुरावे नव्हते.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने सर्व आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. यामध्ये भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात आरोपींचा समावेश आहे. या आरोपींवर दहशतवादी कट रचणे, हत्या आणि धार्मिक उन्माद पसरवण्याचे आरोप होते. 17 वर्षांनंतर या खटल्याचा निकाल जाहीर झाला आहे.
आरोपींच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “या प्रकरणात तीन पूरक चार्जशीट दाखल झाल्या होत्या, परंतु ठोस पुरावे सादर करण्यात आले नाहीत. 95 जण जखमी झाल्याचे सिद्ध झाले नाही, तसेच 15 हजार लोकांचा जमाव जमल्याचा दावाही सिद्ध होऊ शकला नाही. अभिनव भारत या संघटनेशी जोडण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यांचा कोणताही फंड वापरला गेला नसल्याचे स्पष्ट झाले. मकोका आणि यूएपीए कायद्याचे कलम लागू होत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.”
वकिलांनी पुढे सांगितले, “ही घटना दुर्दैवी आहे, आणि त्यात जीव गमावलेल्यांचे नुकसान भरून निघणार नाही. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. आमच्या पक्षकारांचे 17 वर्षे वाया गेली, त्याबाबत आम्ही पुढील निर्णय घेऊ.” या निकालामुळे मालेगावसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
